Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड बचतीच्या विविध योजना….उदय पिंगळे

बचतीच्या विविध योजना….उदय पिंगळे

  October 15,2020

अर्थसमृद्धी

दैनंदिन जीवनात बचत आणि गुंतवणूक ही फार महत्वाची आहे.आपल्या अल्प, मध्यम आणि दीर्घ उद्दिष्टांची काहीअंशी पूर्तता ही बचतीतून होते. सर्वसाधारणपणे प्रत्येकजण थोड्या प्रमाणात लागणारी रक्कम रोख स्वरूपात, परंतू घरातच वेगळ्या ठिकाणी ठेवतात. मोठ्या प्रमाणात अशी रक्कम जवळ ठेवणे धोकादायक ठरू शकते. साठलेल्या रकमेवर व्याजही मिळत नाही. यामुळे बहुतेक सर्वचजण आपल्याकडील अतिरिक्त रक्कम बँक , पोस्ट , पतसंस्था ,भीशी ,चीट फंड व इतर शासकीय योजना यामधे जमा करतात अथवा पगार बँकेमार्फत होत असल्यास गरजेनूसार रक्कम काढून घेवून उरलेली रक्कम शिल्लक ठेवली जाते. या योजना मधून पतसंस्थां, बँका , सरकारी योजना ,बिगर बँकिंग संस्था यांना भांडवल म्हणून अल्पदरात मोठ्या प्रमाणात रक्कम उपलब्ध होते. या सर्व संस्था कोणत्या ना कोणत्या नियामकाचे मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याने, ठेवींवर अल्प व्याज देत असल्याने ,त्याचप्रमाणे अडीअडचणीला रक्कम ताबडतोब देत असल्याने लोक विश्वासाने आपले पैसे तेथे ठेवतात. या किंवा अशा योजना आपणास माहीत असतीलच आपण या लेखातून अशा विविध योजनांची माहिती घेवूया.

1)बचत खाते : (Saving account )

या प्रकारचे खाते बँक ,पोस्ट ,पतसंस्था यामध्ये उघडता येते. खाते उघडण्यासाठी ओळख व रहिवासाचा पुरावा (KYC) द्यावा लागतो. यांच्यातील स्पर्धेमुळे प्रत्येक संस्थेचे नियम थोडेफार वेगवेगळे आहेत. असे असले तरी या खात्यामधे रक्कम कधीही भरता येते आणि कधीही काढता येते. दैनंदिन शिल्लक रकमेवर दर तीन महिन्यांनी व्याज देण्यात येते. व्याजदर प्रतिवर्ष 3.5ते 6% यामध्ये आहे. यावर व्यक्तीला मिळणारे ₹10000/- पर्यंतचे व्याज 80टी टी ए नुसार करमूक्त आहे.

2)मुदत ठेव : (Fixed deposit )

वर उल्लेख केलेल्या संस्थाशिवाय काही नोंदणीकृत कंपन्या, सार्वजनिक न्यास अशा ठेवी स्वीकारतात. याच्या नावाप्रमाणे रक्कम विशिष्ट मुदती करीता ठेवली जाते. व्याज दर 3.5 ते 8%पर्यत असू शकतो. तर मुदत 14दिवस ते 30वर्षे एवढी असू शकते.रक्कम मुदतीपुर्वी काढायची असल्यास काही घट कापली जावू शकते.रक्कम गुंतवण्यापूर्वी शर्ती व अटी तपासून घ्याव्या. मिळणारे व्याज करपात्र असून सध्या व्याजदर 8% च्या आसपास आहे याचे भान ठेवावे. सरकारी बँकामधे हा दर जास्तीत जास्त 7.1% आहे, सहकारी बँका ,पतसंस्थांचे मधे 8% आहे ,पोस्टामधे 7.6%आणि कंपन्यांमधे 9%आहे. वरिष्ठ नागरिकांना 1/4% अधिक व्याज बँक ,पतसंस्था व कम्पनीमधे दिले जाते. ठेवीवरील व्याज ठराविक मुदतीने अथवा मुदतपुर्तीचे वेळी येते.व्याजदर हे वेळोवेळी मागणी पुरवठ्याचे तत्वानुसार बदलत असतात याची माहिती पैसे ठेवण्यापूर्वी करावी. काही पतसंस्थांमधील ठेव ही ₹50000/-पर्यत व बँकेतील ठेव 1 लाख रुपयापर्यत सुरक्षित असते.पोस्टामधील ठेवीना सरकारची हमी असते. कंपनीठेवी या पूर्णपणे असुरक्षित समजल्या जातात तेव्हा तेथे ठेव ठेवताना मान्यताप्राप्त पतमापन संस्थेने दिलेल्या दर्जावरून निर्णय घेणे जरुरीचे आहे. उच्च दर्जा मिळवलेल्या (ट्रिपल ए ) कंपनीतील ठेवी सुरक्षित असतात. तेव्हा ठेव ठेवताना व्याजदर ,रोकड सुलभता आणि सुरक्षितता या सर्वांचा विचार करावा. बँक , गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या यांच्या 5 वर्षे मुदतीच्या टेक्स सेविंग एफ डी ला एकूण मर्यादेत 80/सी नुसार ₹150000/-पर्यत सूट मिळते.

3)आर्वती ठेव योजना :(Recurring deposit )

एका ठराविक मुदतीत दरमहा ठरावीक रक्कम जमा करून मुदतपूर्तीचे वेळी एकरकमी मोठी रक्कम व्याजासह घेणे अशा प्रकारची ही योजना आहे. याचे खाते बँक ,पतसंस्था,पोस्ट ,वित्तीय संस्था येथे काढता येत असून त्याचा व्याजदर हा मुदत ठेवीचे व्याजदराएवढाच असतो. यावर मिळणारे व्याज करपात्र आहे.

4) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे :(National Saving Certificate )

सदर योजना ही 5 वर्ष कालावधीच्या मुदत ठेवीचा एक प्रकार असून याची रक्कम व्याजासह मुदतपूर्तीचे वेळी मिळते. ही प्रमाणपत्रे ₹100/-,500/-,1000/-,5000/- 10000/- यामधे उपलब्ध असून व्याजदर 7.6%आहे . जमा रक्कम व व्याज यांना एकूण मर्यादेत ₹1.5लाख रुपयापर्यत 80/सी नुसार सूट मिळते.कर्जासाठी तारण म्हणूनही या प्रमाणपात्रांचा उपयोग होतो. मिळणारे व्याज करपात्र आहे.

4) किसान विकास प्रमाणपत्र :

ही एक दाम दुप्पट मुदत ठेव योजना असून या मधे ठेवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम 118महिन्यानंतर मिळते.2.5 वर्षानंतर कधीही रक्कम काढून घेता येते. व्याजदर 7.3%असून व्याज करपात्र आहे.

5) पब्लिक प्रोव्हीडंड फंड :(PPF)

करमुक्त परतावा देणारी ही लोकप्रिय सरकारी योजना असून त्याचे खाते पोस्ट किंवा बँकेत काढता येते. ही योजना 16 आर्थिक वर्षाची असून यामधे दरवर्षी किमान ₹500/- कमाल 1.5 लाख एवढी रक्कम एकरकमी अथवा वर्षभरात 12हप्त्यांत विभागून टाकता येते. जोडीदार व 2अज्ञान मुलांचे नावे पालकास खाती उघडता येवून दरवर्षी सर्व खात्यांत एकत्रित रक्कम एकूण मर्यादेत भरता येते. 80/सी अंतर्गत जमा रकमेवर एकत्रित मर्यादेत ₹1.5 लाख रुपयांची सूट मिळते. 5 तारखेच्या शिल्लक रकमेवर 7.6%वार्षिक व्याज मिळते.मिळणारे व्याज करमुक्त असून त्यावर जप्ती आणता येत नाही. व्याजदर सरकारकडून वेळोवेळी निश्चित केले जातात.तीसरे आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यावर कर्ज व सहावे आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यावर नियमानुसार अंशतः रक्कम गरजेनुसार काढता येवू शकते.16 आर्थिक वर्षे पूर्ण झाली की जर पाहिजे असेल तर 5 वर्षे मुदतवाढ वेळोवेळी वाढवून घेता येते तसेच जमा रकमेतील 60% रक्कम एकदाच अथवा विभागून काढता येते. या खात्यात मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. नियमित उच्च करमुक्त परतावा देणारी तसेच वेळोवेळी आपली आर्थिक गरज भागवणारी अशी ही योजना आहे. मुदत पूर्ती खेरीज हे खाते बंद करता येत नाही.

6)सुकन्या समृद्धी योजना :(Sukanya smruddhi yojana)

पंतप्रधानांच्या बेटी बचाओ बेटी सीखाओ या धोरणानुसार दहावर्षाखालील मुलीचे नावाने पोस्ट अथवा बँकेत सदर खाते उघडता येते. दरवर्षी किमान 1000/-₹ जास्तीत जास्त 1.5 लाख रक्कम एकरकमी अथवा विभागून सदर खात्यात टाकता येते. पालकांना 2 मुलींच्या (अपवादात्मक परिस्थितीत 3) नावे वेगवेगळी अशी दोन खाती काढता येतात. मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यावर शिक्षणासाठी अंशतः रक्कम काढता येते. मुलीचे लग्नाचे वेळी अथवा 21वर्षे पूर्ण झाले की खाते बंद होवून सर्व रक्कम मुलीला मिळते. जमा केलेल्या रकमेवर 80/सी नुसार सवलत मिळते. 10 तारखेपर्यत शिल्लक रकमेवर सध्या वार्षिक 8.1%व्याज दिले जाते. व्याजदर सरकारकडून वेळोवेळी निश्चित केले जातात.

7)मासिक प्राप्ति योजना :(M I S)

या योजनेत ठेवलेल्या पैशांवर दरमहा व्याज दिले जाते. हे खाते पोस्टात उघडता येते. एका व्यक्तीस स्वतंत्रपणे ₹4.5 लाख व संयुक्तपणे ₹9लाख या मर्यादेत एक अथवा अनेक खाती काढता येतात. व्याजदर सरकारकडून वेळोवेळी निश्चित केला जातो. सध्याचा व्याजदर 7.4% आहे. व्याज करप्राप्त आहे. पैशाची गरज असल्यास एक वर्षांनंतर दंड भरून रक्कम काढता येते.

8)वरिष्ठ नागरिक योजना :(Senior Citizen Saving scheme )

ही योजना 60वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीकरीता असून या योजनेचे खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत काढता येते. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या 55 वर्ष पूर्ण व्यक्तीस त्याला पैसे मिळाल्यापासून एक महिन्यात हे खाते काढता येऊ शकते.15 लाख रुपयांचे मर्यादेत एक अथवा अनेक खाती काढता येतात.व्याजदर वेळोवेळी सरकार निश्चित करते. सध्या हा दर 8.3% असून व्याज दर तिमाहीस मिळते.जमा रकमेवर 1.5लाख रुपयांपर्यंत 80/सी खाली सूट मिळते व्याज करपात्र आहे. व्याज बचत खात्यात जमा करण्याची सूचना देता येते. अचानक पैशाची गरज पडल्यास एक वर्षानंतर काही रक्कम दंड भरून पैसे परत घेता येतात.

9)भीशी :

गृहीणी ,अल्पशिक्षित ,छोटे व्यापारी यामध्ये असलेला बचतीचा लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये दरमहा सभासदाकडून ठराविक रक्कम गोळा करून चिठ्ठी टाकून अथवा लिलावाद्वारे एका सदस्यास एकरकमी पैसे दिले जातात. याचे नियमन सभासद संमतीने ठरवतात. जिथे चिठ्ठी टाकून भीशी दिली जाते तेथे अप्रत्यक्ष व्याजाच्या रुपाने प्रथम भीशी मिळणाऱ्यास नफा होतो तर शेवट मिळणाऱ्यास तोटा होतो. जेथे भीशी लिलाव करून दिली जाते तेथे लिलावातून मिळालेली रक्कम काही दिवसांनी सभासदांत वाटली जाते. हा सर्वच व्यवहार गटातील सभासदांच्या परस्पर विश्वासाने चालतो त्याचा गैरफायदा घेऊन रक्कम अपहार करण्याचे अनेक प्रकार झाले आहेत.

10)चीट फंड :

हा भीशीचा सुधारीत प्रकार असून काही खासगी आणि सरकारी कंपन्या त्याचे व्यवस्थापन करतात.

11)बचत गट :

याचे कार्य भीशी प्रमाणे चालते. यासंबंधीच्या मार्गदर्शन तत्वानुसार गटाचे कार्य चालते.

12)सरकारी रोखे /कंपनी कर्जरोखे /नाबार्ड /

पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या वेळोवेळी त्यांच्या गरजेनुसार रोखे विक्रीसाठी आणतात. त्यांची मुदत व्याजदर ,रोकड सुलभता आणि पत यांचा एकत्रित विचार करून आपले पैसे यामध्ये टाकण्याचा विचार करावा.

सर्वसाधारपणे अल्प/मध्यम मुदतीसाठी बचत खाते ,मुदत ठेव , आवर्ती ठेव ,बचत प्रमाणपत्र ,

भीशी ,चीट फंड तर मध्यम ते दीर्घ मुदतीकरीता किसान विकास प्रमाणपत्र ,पी पी एफ ,विविध कर्जरोखे यात गुंतवणूक करावी. मुलीचे शिक्षण व विवाह यासाठी सुकन्या समृध्धी ही योजना असून ज्याना निवृत्तीवेतनप्रमाणे पैशांची सातत्याने गरज आहे त्यांच्याकरीता मासिक प्राप्ती व वरीष्ठ नागरिक योजना आहे. यात उल्लेख केलेले व्याजदर 01/01/2018 पासून लागू असलेले आहेत हे दर सातत्याने बदलत असल्याने पैसे ठेवण्यापूर्वी योजनेची सर्व माहिती करून घ्यावी.जाणकारांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. अलीकडे सर्वच ठिकाणी पैसे ठेवताना व काढताना KYC सक्तीचे केले आहे.त्याच प्रमाणे ठराविक रकमेपेक्षा जास्त व्याज झाल्यास मुळातून करकपात करणे सक्तीचे केले आहे. जे लोक करकक्षेत येत नाहीत त्यांना कर कापू नये म्हणून 15/जी किंवा 15/एच फॉर्म भरून देण्याची सवलत दिली आहे.काही योजनांना प्राप्तिकर सवलत देऊ केली आहे. या सर्वच गोष्टी विचारात घेऊन आपल्या गरजा ,उपलब्ध पैसे यांची योग्य ती सांगड घालावी आणि उत्तम व्यवहारे धन जोडावे.

उदय पिंगळे

ई मेल udaypingale23@gmail.com/udaypingale@yahoo.com

Tags : ,