Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / जीवन समृध्दी ज्याच्या घरी ताक,त्याला सगळ्या गावाचा धाक-गुंतवणूकीची बारा हॉट तंत्रे:रविंद्र टी. कदम

ज्याच्या घरी ताक,त्याला सगळ्या गावाचा धाक-गुंतवणूकीची बारा हॉट तंत्रे:रविंद्र टी. कदम

  October 14,2020

अर्थसमृद्धी
 

सुविचार :

जगातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव मिळवण्यासाठी पैसा खर्च करणे होय … रवींद्र टी.कदम .. आनंदाचे सिक्रेट आनंदवेल

१ ) पैसा एक नोकर समजावा .

पैसा म्हणजे वस्तू किंवा सेवा यांचे मूल्य मोजण्याचे साधन आहे . ते विनिमयाचे (Medium of Exchange ) साधन आहे . साध्य नाही . पैसा निर्माण करा . त्याच्याकडून काम करून घ्या . पैसा माणसाचा नोकर आहे .पैशाने माणूस निर्मान नाही केला . माणसांनं जगण्याचं साधन म्हणून तयार केला .पैसा गरजा भागवण्याचे साधन आहे . गरीब पैशासाठी राबतो . श्रीमंत माणसांसाठी पैसा काम करतो . म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात धनवंता घरी ॥करी धन चि चाकरी ॥

२ ) स्मार्ट वर्क करा :

वेळ आणि श्रम यांचे लिव्हरेजींग करने म्हणजे स्मार्टवर्क होय .विक्रीची कला शिका . पुस्तके वाचा . चिंता नको पन चिंतन करा . जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ॥ उदास विचारे वेच करी॥ तुका म्हणे . स्मार्ट व्यवहार करून पैसा निर्माण करा आणि उदात्त व चांगल्या हेतूने खर्च करा .

३ ) पैसा म्हणजे एक कल्पना असते असे समजा .

कल्पनाशक्ती मनी मॅग्नेटचे काम करते . जगातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव मिळवण्यासाठी पैसा खर्च करणे होय . आर्थिक साक्षरतेसाठी पैसा खर्च करा . श्रीमंत माणसं डोक्यानं चालतात आणि गरीब माणसं पायानं चालतात . श्रीमंत माणसं सकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत काम करतात . गरीब माणसं फक्त सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम करतात . लोकांची गरज भागवण्यासाठी किंवा त्यांना चांगली सेवा आणि वस्तु देण्यासाठी कल्पना लढवा . चांगल्या कामासाठी कल्पनाशक्ती वापरणे म्हणजे प्रतापगडाची लढाई जिंकण्यासारखे आहे .

४ ) मालमत्ता (Asset)आणि ऋण (liability)यातील फरक समजून घ्या .

व्याज, डिव्हिडंड, रोख रक्कम किंवा भाडे, बटई ( खंड ) अशा कोणत्याही स्वरूपात उत्पन्न देणाऱ्या गोष्टीला मालमत्ता (Asset) म्हणतात .ऋण(Liability) काढून उत्पन्न देणारी मालमत्ता (Asset) खरेदी करा . दूध देणारी गाय मालमत्ता असते म्हणून आस्तिकशिरोमणी चार्वाक म्हणतात,” यावत् जीवेद्, सुखं जीवेद्॥ऋणं कृत्वा, घृतं पिबेत्॥” ऋण ( कर्ज Liability) काढून अशी मालमता खरेदी करा, ज्यामूळे पिण्यासाठी दूध- तूप (उत्पन्न ) मिळेल . हे श्रीमंतीच्या दिशेने टाकलेले पहीले पाऊल आहे . मालमत्ता आणि ऋण यातील फरक समजून घेणे म्हणजे अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावण्यासारखे आहे .

५ ) मासिक उत्पन्नापेक्षा खर्च कमी करा . कर्जाच्या हप्त्यापेक्षा गुंतवणूक आणि बचतीचा हप्ता मोठा करा .

दोन महीन्याचे मासिक उत्पन्न नेहमी आकस्मिक खर्च म्हणून कॅश ठेवा . शंभर रूपयांपैकी तीस रुपये कर्जाचा हप्ता असला तर चाळीस रुपये बचतीचा हप्ता करा . बचतीमधून गुंतवणूक करा . दिर्घ काळ गुंतवणूक करा . मूलीचे लग्न, निवृत्तीवेतन नियोजन, मुलांचे शिक्षण असे ध्येय ठेवा . सध्याची आनंदातून जगण्याची स्टाईल सोडू नका . पोटाला चिमटा घेऊन काय करू नका . पाच हजार रुपये मासिक रक्कम २0 % चक्रवाढ व्याजाने गुंतवल्यास वीस वर्षात एक कोटी पंचावन्न लाख रुपये होतात . चांगल्या म्यूच्यूअल फंडात एसआयपी करा . पोष्टातील पीपीएफ महासुरक्षीत सरकारी गुंतवणूक वर्षाला आठ टक्के चक्रवाढ व्याज देते .वरून टॅक्स सवलत मिळते .ELSS मधून टॅक्स आणि एसआयपी चा फायदा घेता येतो . चांगल्या शेअर खरेदीमधून दिर्यकाळात बोनस आणि डिव्हीडंडचा फायदा घ्या .

६ ) शेअर बाजारातील फंडामेंटल आणि टेक्नीकल विश्लेषण पध्दत शिकून स्मार्ट गुंतवणूकदार व्हा :

शेअर बाजार मासिक उत्पन्न आणि दिर्घकालीन वेल्थ क्रियेशनसाठी चांगला व्यवसाय आहे .कंपनी तयार करण्यात रिस्क असते . तुम्ही फायद्याचे भागीदार व्हा .आयत्या पिठावर कायद्याने रेघोट्या ओढा . अर्थिक साक्षर होऊन बुद्धीबळाचा डाव खेळण्यास तयार व्हा .

७ ) विमा हे गुंतवणूक साधन नाही .

विमा हे गुंतवणूक साधन नसून सुरक्षेचे साधन आहे . सुरक्षेसाठी टर्म प्लॅन , मेडीक्लेम घ्यावा .

८ ) गुंतवणूक आणि ट्रेडिंग यामधील फरक लक्षात घ्या .

एका कोंबडीपासून अनेक अंडी तयार होतात . ती अंडी उंबवल्यावर अनेक कोंबडया तयार होतात . ही गुंतवणूक आहे . गुंतवणूकदार कोंबडया घरी ठेवतो . व्यापारी हा खरेदी आणि विक्री यातील फरकाचा नफा घेतो .

९ ) गुंतवणूक म्हणजे साधन नाही .

गुंतवणूक म्हणजे तुमचे आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी तयार केलेला प्लॅन असतो . शेअर मार्केट, रिअल इस्टेट, सोनं चांदी ही गुंतवणूकीची साधने आहेत . तुम्हाला मुंबईला जायचे ध्येय आहे . टॅक्सी किंवा रेल्वे ही प्रवासाची साधने असतात . शेअर बाजार किंवा सोनं चांदी हे आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी गुंतवणूकीच्या प्रवासाची साधने आहेत . अभ्यासासाठी पैसा गुंतवा .

१० ) कमी वयात गुंतवणूकीला सुरुवात करा .

चक्रवाढ व्याजाची जादू हे जगातील आठवे आश्चर्य आहे असे अल्बर्ट आईनस्टाइन यांचे मत आहे . श्रीमंत होण्यासाठी मोठा विचार करा . विचार म्हणजेच वस्तू किंवा पैसा होय असे ” थिंक अॅण्ड ग्रो रिच” पुस्तकाचे लेखक नेपोलियन हिल म्हणतात .

११ ) लिव्हरेजिंग करा .

दुसऱ्या लोकांचा पैसा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ( योग्य मोबदला देऊन ) यांचा स्वतःसाठी उपयोग करून घेणे म्हणजे श्रम आणि पैसा यांचे लिव्हरेजींग करणे होय . महीन्याला तीस हजार पगार घेणारा माणूस पस्तीस वर्षात दोन कोटी रुपये कमावतो . त्यापैकी वीस टक्के टॅक्सवर जातात . बाकीचे पैसे जगणे, घराचे हप्ते, वाहन हप्ते, चैनीच्या वस्तूचे हप्ते यात खर्च होतात . आज बजाज कंपनीकडे पस्तीस हजारपेक्षा जास्त कामगार आहेत . ३५००० X ८= २,८०,००० एवढे तास फक्त चोवीस तासात त्यांच्यासाठी काम केले जाते . याला श्रम आणि वेळ यांचे लिव्हरेजींग म्हणतात . उदयोजक व्हा .

१२ ) आम्हां घरी धन | शब्दांचीच रत्ने |शब्दांचीच शस्त्रे |यत्ने करू॥ तुका म्हणे .

श्रीमंत माणसं कामावर प्रेम करतात .पैशावर नव्हे . गरीब माणसं पैशावर प्रेम करतात . कामावर नव्हे . बायबल, कुराण,गीता , संत तुकारामांची गाथा ही दिव्य शब्दांची पुस्तके आहेत . शब्द हाच देव असतो . शब्द जीवाचे जीवन आहे . शब्द ही या पृथ्वीवरची सर्वात मोठी संपत्ती आहे . येशू ख्रिस्त एकदा म्हणाले होते की लोक भाकरीवर नव्हे तर माझ्या वचनांवर जगतील . शब्दांच्या रत्नांची किंमत ओळखा . किंमत ओळखा . मूल्य ओळखा . किंमत आणि मूल्य यातील फरक समजून घ्या .

टिप :

सदर लेख रवींद्र टी.कदम यांच्या आनंदाचे सीक्रेट ……आनंदवेल या पुस्तकातून किरकोळ बदल करून लिहीला आहे . अनुराग प्रकाशन, सोलापूर यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद . हा लेख आवडला असेल नावासहीत आपल्या मित्रांना शेअर करा . खाली कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहा . तुमच्या प्रतिक्रिया मला नवीन लेखन करण्याची ऊर्जा आणि उर्मी देतात . धन्यवाद ! …..

रवींद्र तुकाराम कदम

निवृती नियोजन

Tags : ,