Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड बचत आणि गुंतवणूक :भारतातील अर्थसाक्षरता ठळक निरीक्षणे आणि वैशिष्टे: उदय पिंगळे

बचत आणि गुंतवणूक :भारतातील अर्थसाक्षरता ठळक निरीक्षणे आणि वैशिष्टे: उदय पिंगळे

  October 13,2020

भारतातील अर्थसाक्षरतेबद्धल एका संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच वाचण्यात आले. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :–

1)बहुतेक लोक FD आणि Insurance (Money back) यांना गुंतवणूक समजतात.

2)सोन्याचे दागिने व रहाते घर यांचे सध्याचे बाजारमूल्य कितीही जास्त असले तरी ते आभासी आहे. त्याचा फारसा काही उपयोग नसून त्याने फक्त मानसीक समाधानच लाभू शकते.

3)महागाईवर मात करणारा परतावा मिळाला पाहिजे हे अनेकांना माहीत नाही.

4)म्यूचुयल फंड हा विमा प्रकार असून SIP ही पॉलिसी आहे असे अनेकांना वाटते.

5)आपल्याकडे किती रकमेची, कोणत्या कंपनीची आणि किती वर्षाची विमा पॉलिसी आहे; तसेच कोणत्या म्यूचुयल फंडामधे आपली किती रक्कम आहे हे अनेकांना अंदाजेही सांगता येत नाही आपल्या विमा रकमेवर मिळत असणारा परतावा 6% पेक्षाही कमी आहे हे अनेकांना माहीत नाही.

6)फारच थोड्या लोकांनी योग्य रकमेचा, योग्य मुदतीचा आणि योग्य वर्षांचा मुदत विमा (Turm insurance) व आरोग्यविमा (Mediclaim) घेतला आहे. यामधे भरत असलेल्या हप्त्यांचा उपयोग न होण्यातच आपला खराखुरा फायदा आहे, हे त्यांचा लक्षांतच येत नाही.

7)अनेक लोक भविष्यकाळातील तरतुदीबद्दल जागरूक नाहीत तर अनेकजण मुलांवर अवलंबून आहेत.

8)गुंतवणूक साधनांची वेगवेगळ्या प्रकारांत विभागणी करायची असते हे कित्येकाना माहीत नाही.

9)येथील बहुतेक लोकांना व्याज करपात्र तर लाभांश आणि मुळातून STT कापला असेल तर दीर्घमुदतीचा भांडवली नफा करमुक्त याची माहिती नाही.

10)सोन्याचे दागिने घेण्याऐवजी शुध्द स्वरूपातील सोने, गोल्ड ETF अथवा गोल्ड Bonds मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे याची लोकांना जाणीव नाही.

11)Taxfree bonds हे 80/सी ची सवलत देतात असे बरेचजण मानतात तर 54/ई सी bonds, infrabonds, pms, corporate fds यांविषयी फारच थोड्या लोकांना माहीती आहे.

12)पूर्णपणे आर्थिक नियोजन करणारे लोक नगण्य आहेत.

या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकच निष्कर्ष काढता येईल की आपल्याकडे गुंतवणूक संस्कृती रुजलेली नाही.

असे होण्याचे महत्वाचे कारण असे की आपण आपले जे पैसे बचत खाते,मुदत ठेवी, पोस्टाच्या योजना, पीपीएफ आणि मनी बॅक पॉलिसीमध्ये टाकले आहेत; सोन्याचे दागिने केले आहेत त्यालाच गुंतवणूक असे समजत आहोत परंतू ही गुंतवणूक नसून बचत आहे. बचत आणि गुंतवणूक यांचा एकमेकांशी सबंध असला तरी या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ढोबळमनाने असे म्हणता येईल की उत्पन्नातील असा भाग जो गरजांसाठी खर्च न करता साठवून ठेवला आहे किंवा वेगवेगळे खर्च केल्यावर जी रक्कम शिल्लक रहाते ती म्हणजे बचत तर गुंतवणूक म्हणजे अशी ठरवून केलेली प्रक्रिया ज्यामधे आपण आधिक फायदा मिळवण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिठ्ये पाहूया :–

1)बचतीमध्ये पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवतो त्यामुळे नजीकच्या काळात वापरू शकतो. उदा. बचत खाते, मुदत ठेव, परावर्तीत ठेव, आवर्ती ठेव तर गुंतवणूकीत आपण पैसे अशा साधनांमध्ये ठेवतो की ज्यापासून भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकेल उदा. समभाग, यूनिट, फ्यूचर, सोनेचांदी, वस्तू बाजारपेठ, स्थावर मालमत्ता.

2)बचत ही अल्पकालीन क्रिया असून तिची सुरुवात कधीही करता येते तर गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे त्यामुळे तिची सुरुवात जितक्या लवकरात लवकर करू तेवढे चांगले.

3) बचतीचे पैसे नजीकच्या काळात वापरू शकतो तर गुंतवणुकीचा भविष्यकाळात उपयोग होतो.

4)बचत ही सवय तर गुंतवणूक ही प्रक्रिया आहे.

5)बचत ही सुरक्षित असून त्यावर मिळणारा लाभ अल्प आहे तर गुंतवणूकित जोखिम जास्त असून जेवढी जोखिम जास्त तेवढा मोठा फायदा किंवा तोटा होण्याची शक्यता असून क्वचित प्रसंगी मुद्दल गमावण्याचा धोकाही आहे.

6) बचतीत सुरक्षितता असल्याने त्याचा आढावा घ्यावा लागत नाही तर गुंतवणूकीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यांतील बदलांबद्धलचा निर्णय त्वरित घ्यावा लागतो.

7)बचतीची साधने आपणास निष्क्रिय बनवतात तर गुंतवणूकीची साधने स्वातंत्र्याचा अनुभव देतात.

8)बचतीचे पैसे अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडतात तर गुंतवणूकीचे साधनातून दीर्घ काळासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात.

9)बचत ही भीतीपोटी केली जाते तर गुंतवणूक आत्मविश्वासपूर्वक करावी लागते.

10)बचतीचे पैसे त्वरित उपलब्ध होतात तर गुंतवणूकीतील पैसे मिळवण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो.

11)बचतीसाठी फारशा ज्ञानाची गरज नसते तर गुंतवणूकीसाठी सखोल ज्ञान व नियोजनाची गरज गरज असते. तज्ञांची मदत घ्यावी लागते अथवा स्वतः तज्ञ व्हावे लागते.

12)बचतीमुळे पैशाचे रक्षण होते तर गुंतवणुकीमुळे योग्य उत्पन्न व चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्याने चलनवाढीवर मात करता येते.

वरील सर्व विवेचनावरून अशी समजूत होऊ शकते गुंतवणूक चांगली व बचत वाईट किंवा बचत चांगली आणि गुंतवणूक वाईट परंतु यामधील कोणतीही एक गोष्ट पूर्ण बरोबर व दुसरी गोष्ट पूर्ण चूक असे नसून आपली अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची ध्येये पूर्ण करण्यासाठी बचत आणि गुंतवणूक या दोघांची आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका आहे. जर बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल आपण साधु शकलो तर आणि तरच भविष्यातील वाढत्या गरजा व चलनवाढ यांच्याशी सामना करू शकू.

दुर्दैवाने आपल्या शालेय शिक्षणात बचत आणि गुंतवणूक यांतील फारच थोड्या गोष्टींचा स्पर्श होतो, तरीही इतर अनेक गोष्टी आपण जीवनात करून पाहतो.चूकतो, धडपडतो, पडतो पुन्हा उठून उभे राहतो. आपले ज्ञान आणि अनुभव यांची सांगड घालून पैशांच्या सर्व बाजूंचा विचार करून, व्यवहारिक व व्यवसायिक दृष्टीकोन बाळगू शकलो तर आपल्या स्वकष्टार्जित व वडिलोपार्जित सम्पत्तीचा सांभाळ करू शकू. तेव्हा पैशाच्या सर्व पैलुंचा विचार करूया, माहिती घेऊया, जागरूक राहू, नियोजन करू आणि स्वतःबरोबरच इतरांनाही अर्थसाक्षर करूया.



SIP

Tags : ,