Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / म्युच्युअल फंड सल्लागार, सेबीची नवीन नियमावली आणि गुंतवणूकदार……उदय पिंगळे

सल्लागार, सेबीची नवीन नियमावली आणि गुंतवणूकदार……उदय पिंगळे

  October 22,2020

गुंतवणूक सल्लागार, सेबीची नवीन नियमावली आणि गुंतवणूकदार……😉

गुंतवणूकदार म्हणजे तुमच्या आमच्यासारखी कोणीही व्यक्ति अथवा संस्था ज्यांना आपली अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची ध्येय्ये गाठण्यासाठी उपलब्ध असलेल्या पैशांतून चांगला परतावा मिळवायचा आहे. परंतू असा पैसा विनासायास मिळत नाही तर त्याकरिता कष्ट घ्यावे लागतात, अभ्यास करावा लागतो, नियोजन करावे लागते. गुंतवणूकदार त्याचे समोरील उपलब्ध पर्याय, त्यामधील जोखिम, निर्णयक्षमता आणि उपलब्ध पैसे यांची उत्तम सांगड घालण्यासाठी ‘गुंतवणूक सल्लागाराची’ मदत घेऊ शकतो. येथे ‘गुंतवणूक सल्लागार’ हा शब्द समभाग, राेखे,म्यूचुयल फंड योजना, वायदे व्यवहार, वस्तू बाजारपेठ, समभाग सलग्न बचत योजना (ELSS), विमा सलग्न, निवृत्ती सलग्न योजना (ULIP/ELPS) याच्या संदर्भात मर्यादित अर्थाने वापरला आहे. यापैकी काहींचे नियंत्रण वेगवेगळ्या नियामकाकडे असले तरी त्या भांडवलबाजाराशी संबधीत असल्याने त्यावर अंतिम नियंत्रण सेबीचे (Securities and Exchange Board India) आहे.

कोण आहेत हे गुंतवणूक सल्लागार? कोणीही आपले मित्र, नातेवाईक, गुंतवणूकीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेल्या व्यक्ती, विविध गुंतवणूक संस्थांचे अभीकर्ते, वितरक, सल्लागार, बँक कर्मचारी इ. हे लोक आपले वैयक्तिक व व्यक्तिगत सबंध, ते काम करीत असलेल्या संस्थांची समाज मनातील प्रतिमा यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात मध्यम व उच्च मध्यम वर्गाकडून गुंतवणूक खेचत आहेत. त्यांचे गुंतवणूकदाराशी असलेले सबंध हे मागील पिढीतील फॅमिली डॉक्टरसारखे असावेत. त्यानी गुंतवणूकदाराला त्याचे जरूरीप्रमाणे योग्य तो सल्ला द्यावा व आपला व्यवसाय प्रमाणितपणे करवा अशी अपेक्षा होती परंतू त्यांच्याविषयी आलेल्या अनेक तक्रारीवरून हे लोक गुंतवणूकदारांकडे दुर्लक्ष करून त्याना मिळणारे कमीशन, भेटी, बढती आणि विपणन लक्षे पूर्ण करण्याचा नादात अवास्तव आश्वसने देऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचे आढळून आल्याने त्यांचावर नियंत्रण आणण्यासाठी 21 जानेवरी 2016 रोजी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यामधे गुंतवणूक सल्लागाराचे त्याचे ग्राहकाप्रती असलेले दायित्व अधोरेखित करण्यात आले होते. बँकिंग व्यवसाय करणाऱ्यानी गुंतवणूक सल्लागाराचा व्यवसाय बँकेचे मार्फत न करता येत्या तीन वर्षात वेगळी उपकंपनी स्थापन करून त्यामार्फत करावा. गुंतवणूक सल्लागाराने जर तो एखाद्या योजनेचा अभिकर्ता, वितरक किंवा पुरस्कार्ता असेल तर त्याची माहिती त्याला मिळणारे कमिशन याची माहिती गुंतवणूकदारास द्यावी इ. तरतुदी सुचवल्या होत्या ज्या व्यवसाय पारदर्शकतेच्या दृष्टीने योग्यच होत्या. परंतू दोन नियंत्रकातील आभावामुळे 16 एप्रिल 2016 आरबीआईने बँकाना परिपत्रक पाठवून गुंतवणूक सल्लागाराचा व्यवसाय बँकिंग व्यवसापासून वेगळा करावा असे सांगितले. दरम्यात AMFI या म्यूचुअल फंडाच्या शिखर संस्थेने जे गुंतवणूकदार अभिकर्त्याशिवाय गुंतवणूक करीत आहेत त्यांची माहिती गुंतवणूकदाराचे संमतीने गुंतवणूक सल्लागाराना देण्याची मागणी केली. PARDA या निवृत्तीवेतन नियामकाने निवृत्तीसबंधी सल्ला देण्यास योग्य व्यक्तिचे निकष जाहीर केले. एकूणच जगभरात गुंतवणूक सल्लागार स्वतंत्रपणे व्यवसाय करीत असून ते त्यांचा मोबदला गुंतवणूकदाराकडून वसूल करीत असल्याने त्यास अनुसरून SEBI ने नवीन नियमावली 7 ऑक्टोबर 2016 रोजी जाहीर केली आहे. त्यांतील महत्वपूर्ण मुद्दे असे :–

1)गुंतवणूक सल्लागाराचा व्यवसाय करणाऱ्या अभिकर्ते, वितरकांना यापुढे गुंतवणूक सल्लागार म्हणून व्यवसाय करता येणार नाही. जर त्याना हा व्यवसाय करायचा असेल तर नव्याने नोंदणी करून आधीचा व्यवसाय बंद करावा लागेल व आपले पूर्वीचे व्यवसायिक सबंध जाहीर करावे लागतील.

2)स्टॉक ब्रोकर, पोर्टफोलीओ मॅनेजर,सी ए, सी एस, फायनानशियल प्लॅनर यांचा गुंतवणूक सल्ला हा जरी मूळ व्यवसाय असेल तरी गुंतवणूक सल्लागार म्हणून नव्याने नोंदणी करावी लागेल. मर्चंट बेंकर, कॉरपोरेट पोर्टफोलीओ अड्वाइज़र्स आणि ज्या व्यक्ती IRDA व PARDA यांच्यासाठी विविध योजना बनवित आहेत त्याना नोंदणीतून वगळण्यात आले आहे.

3)व्यापारी बँकाना उपकंपनीमार्फत तर नॉन बँकिंग कंपनीला वेगळा विभाग स्थापन करूनच गुंतवणूक सल्लागाराचा व्यवसाय करता येईल,त्यांच्या अभीकर्ते व वितरक यांना हा व्यवसाय करता येणार नाही.

4)गुंतवणूक सल्ला म्हणजे समभाग सलग्न योजना, समभाग खरेदी विक्री यासंबंधी लेखी तोंडी अथवा माध्यमातून सल्ला देणे अशी करण्यात आली असून वृतपत्रे मासिके सोशल मीडिया यातून सल्ला देताना रिसर्च एनेलेसीस रेग्युलेशनचे पालन करावे लागेल.

5)फक्त नोंदणीकृत सल्लागारानाच Tips, SMS, E mail,Blogs, Internet आणि इतर सोशल मीडिया या माध्यमातून सल्ला देता येईल.

6)भांडवल बाजाराशी संबधीत योजनांची माहिती देण्यासाठी मेळावे घेणे बक्षिसे देणे यावर बंदी आहे. अनुचित व्यापारी प्रथेखाली असे करणे गुन्हा होईल.

7)रिसर्च एनालिस्ट यांनी काय करावे व काय करू नये याविषयी महत्वपूर्ण तरतुदी आहेत.

8)गुंतवणूक सल्लागाराने गुंतवणूकदाराशी करार करून त्यासाठी सुयोग्य फीची आकारणी करावी. दिलेल्या सल्ल्याची आणि गुंतवणूकदाराची नोंद ठेवावी. जोखमीच्या बाबी गुंतवणूकदारास लेखी द्याव्यात. कोणत्याही निश्चित परताव्याचे आश्वासन देऊ नये.

9)गुंतवणूक सल्लागार आणि गुंतवणूकदार यांतील वादाचे मुद्दे लवाद कायद्यानुसार सोडवण्यात यावेत.

10)गुंतवणूक सल्लागाराने किंवा पुरस्करत्याने जाहिरात करताना खोटी माहिती अवास्तव अश्वासने देऊ नये.

11)गुंतवणूकदारास फ्री ट्रेडिंग टिप्स देता येणार नाहीत. गुंतवणूकीसंबंधी वेगवेगळी सॉफ्टवेर त्यांतील धोक्याची जाणीव करून दिल्याशिवाय सुचविता येणार नाहीत.

12)गुंतवणूक सल्लागाराची किमान शैक्षणिक पात्रता निश्चित केली असून त्याने दिलेल्या सल्यांची 5 वर्षे नोंद ठेऊन दर तीन महिन्यांनी त्याचे लेखापरीक्षण करण्यात येईल.

अशा प्रकारे ग्राहकांच्या हिताचे दृष्टीने अनेक चांगल्या तरतुदी या नियमावलीत आहेत. मात्र या नियमावलीचे कायद्यात रुपांतर झाल्यावर त्याचे नियमन करण्याएवढी सक्षम यंत्रणा आज तरी SEBI कडे नाही.त्याचप्रमाणे काही तरतुदी इतक्या कडक आहेत की या विषयावर चर्चा करणे हासुद्धा गुन्हा होईल की काय असे वाटते. कोणत्या गुन्ह्यांस कोणती शिक्षा असे ठोस न सुचवल्याने न्यायालयीन वाद वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा सर्व प्रकारचा माध्यमांतून गुंतवणूकदाराना जागरूक करणे हाच त्यावरील उपाय असून हे मोठे आव्हान SEBI कडे आहे. भांडवल बाजारातील गुंतवणूक अनिश्चित व दीर्घकालीन असते सध्या या नवीन मसूद्याचे कायद्यात रुपांतर करण्यासाठीचे आक्षेप, तक्रारी, हरकती मागवल्या असून जिज्ञासूंनी त्या पहाव्यात व त्यावर आपले मतप्रदर्शन करावे म्हणजे त्यातील योग्य मतांचा कायदा करताना विचार केला जाईल.

उदय पिंगळे
मोबाईल क्रमांक 8390944222
ई मेल udaypingale@yahoo.com/udaypingale23@gmail.com

Tags : ,