Blog Detail

Invest Like Money Tree

Home / Blog / जीवन समृध्दी 5 Books That changed My Life (… या पाच पुस्तकांनी माझे जीवन बदलले ) : रविंद्र टी . कदम

5 Books That changed My Life (… या पाच पुस्तकांनी माझे जीवन बदलले ) : रविंद्र टी . कदम

  November 14,2020

आज मी ज्या पाच पुस्तकांनी माझ्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे त्यांची ओळख करून देत आहे . सातवीपासून मला अवांतर वाचनाची आवड आहे . बारावीपर्यंत मी कादंबऱ्यांच्या जगात जगत होतो . सुमारे पाचशेपेक्षा जास्त कादंबऱ्या वाचल्या आहेत . बाबा कदम हे आवडते कादंबरीकार होते .नंतर वैचारीक आणि परिवर्तनवादी पुस्तके वाचनात आली . आता सध्या आठवड्याला किमान दोन -तीन नवीन पुस्तके वाचत असतो . आत्तापर्यंत सुमारे अडीच हजार पेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत . काही पुस्तके बरी होती तर काही चांगली .परंतु मोजक्या पुस्तकांनी माझ्या जीवनात बदल घडवून आला . मला इतिहास, उद्योजकता आणि प्रेरणादायी पुस्तके वाचायला आवडतात .

… या पाच पुस्तकांनी माझे जीवन बदलले

या पोष्ट मध्ये ज्यांनी मला बदलले त्या पुस्तकांची माहीती देत आहे . तुम्ही ही पुस्तके खरेदी करून संग्रही ठेवा . वाचा आणि ज्ञानाचा जीवनात उपयोग करा . तुमच्या भावी पिढीसाठी नक्कीच ही पुस्तके उपयोगी पडणार आहेत . मला खात्री आहे की या पुस्तकांमूळे तुमच्यासुद्धा जीवनात वैचारीक वादळ निर्माण होईल .

१ ) The Magic of Thinking Big..David J Shwartz ( मोठा विचार केल्यामूळे होणारे चमत्कार )

हे पुस्तक पन्नास वर्षांपूर्ण लेखक डेविड श्वाट्झ यांनी लिहीले आहे . मला या पुस्तकातून खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या .
मी थोडया गोष्टींचा उल्लेख करत आहे .
१ ) कृती केल्यामूळे भिती मरते .
२ ) मोठा विचार कसा करावा ?
3 ) कोणत्याही अवघड परिस्थीती मध्ये, संकट काळात सकारात्मक विचार कसा करावा ?
४ ) ध्येय कसे ठरवावे ?
५ ) अपयशाचे यशात कसे रूपांतर करावे ?
या पुस्तकात मी खूप अंडरलाइन केल्या .जीवनात संकटे आल्यावर मी हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचले आहे . ज्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे .
पुस्तक खरेदीकरण्यासाठी पुढील लिंकवर जावे….. https://amzn.to/2UtvEZj दिपावलीनिमित्त पुस्तके खुप सवलतीच्या दरात उपलब्द आहेत.

२ ) Think and Grow Rich By Nepolean Hill ( विचार करा आणि श्रीमंत व्हा )

या पुस्तकाशिवाय ही यादी अपूर्ण आहे . जगातील प्रेरणादायी पुस्तकांच्या यादीत याला बायबल मानले जाते . हे सदाहरीत पुस्तक आहे . हे पुस्तक नेपोलियन हील यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहीले आहे . हे पुस्तक लिहीण्यासाठी त्यांनी शंभर पेक्षा जास्त कोट्याधीश लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या . हे जीवन यशस्वी होण्यासाठी सतरा तत्वे त्यांनी सांगितली आहेत .

या पुस्तकातून विशेष काय शिकलो या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत .
१ ) विचार म्हणजेच वस्तू . सेवा किंवा वस्तू म्हणजेच पैसा .
२ ) तुमची तीव्र इच्छा हीच यशाची सुरुवात असते .
३ ) वैयक्तीक कौशल्य मिळवण्याचे फायदे
४ ) मास्टरमाईंड तत्त्वाचे जिवनातील महत्त्व
५ ) नियोजन का करावे ?कामाचे नियोजन कसे करावे ?
६ ) सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलीत
६ ) तुमच्या सुप्तमनाची ताकद
हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचल्यावर प्रत्येक वेळी नवीन शिकायला मिळते . हे पुस्तक वर्षातून दोन वेळा वाचावे .मी आत्तापर्यंत किमान दहा वेळा हे पुस्तक वाचले आहे .शंभर वर्षांपूर्वीची माहीती आजही ताजीतवानी आणि जीवनासाठी फायदयाची आहे . हे पुस्तक खरेदी करून वाचा . हे पुस्तक नक्की तुम्हाला आवडेल .
https://amzn.to/35r3g0m

३ ) How To Win Friends and Influence people by Dale Carnegie ( माणसे कशी जोडावी ? )

मी लाजरा बुजरा आहे . मला जास्त माणसात मिसळायची सवय नाही .मी वाडी वस्तीवरील तोंड़ावरील माशी न उठणाऱ्यांपैकी एक आहे . या पुस्तकाने माणसे जोडणे आणि टिकवणे तसेच चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे फंडे शिकायला मिळाले . आता दुसऱ्या व्यक्तींबद्दल मला वाटणारी भिती काही प्रमाणात कमी झाली आहे . आता मी लोकांमध्ये मिसण्याचा प्रयत्न करत आहे . सगळयांशी गोड बोलणे, समोरच्या चे कौतूक करणे आणि अपराध पोटात घालणे ही या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे . या पुस्तकातून लोकांना तुमच्या गोष्टी मान्य करायला लावण्याच्या सहा मार्ग शिकता येतील . लोकांना राग येऊ न देता व आक्रमक होऊ न देता कसे बदलावे ?लोकांना जिंकून घेण्याचा मुलमंत्र कोणता ? कोणत्या मार्गाने गेल्यावर तुमचे शत्रू तयार होतील ?

आता मी दुसऱ्यांच्या दृष्टीकोनातून विचार करू लागलो आहे . आपण त्यांच्या जागेवर असतो तर कसे वागलो असतो असा विचार करून प्रतिसाद देऊ लागलो आहे .मी दररोज स्वतःची बॉडी लँग्वेज तपासतो . माझ्या सकारात्मक विचारांकडे लक्ष ठेवतो . व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य समृध्द करून यशस्वी होण्यासाठी https://amzn.to/2UqpusX हे पुस्तक वाचावे .

विद्रोही तुकाराम : डॉ आ . ह. साळुंखे

कवी आणि संत तुकाराम .विद्रोही म्हणजे अन्यायाविरूध्द लढणारे तुकाराम . गेल्या साडेतीनशे वर्षांपासून मराठी भावविश्वातील ध्रुवतारा म्हणजे संत तुकाराम !त्यांचे अभंग म्हणजे संस्कृतीची ताजी, टवटवीत पालवी होय . धगधगता निखारा आणि सिंह म्हणजे संत तुकाराम . ऐन वीशीत कर्ज खते इंद्रायणीत बुडवून शेतकऱ्यांना कर्जमूक्त करणारे सावकार तुकाराम . शेती, व्यापार करत कुटूंबाचा संसार उभा करताना समाजाची निर्मळ आणि आदर्श उभारणी करणारे योध्दा तुकाराम . त्यांचे अभंग लोकांत मनात सुभाषित रूप घेऊन लोकांच्या मनात बसले आहे . अडाणी, निरक्षर लोकांनी त्यांचे अभंग सात काळजाच्या आत जपले आणि पाचवा वेद म्हणून पूजले . भांब नाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाल्यावर त्यांनी कर्जखते इंद्रायणीत बुडवून सामाजिक न्यायाचे पहीले पाऊल उचलले .वेदांचा मी अंकीत नाही , अशी त्यांनी घोषणा केली . प्रस्थापित लोकांच्या वैराचा ज्वालामूखी अंगावर झेलत त्यांनी समाजाचे निर्मलीकरण केले . त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस कशा प्रकारे युध्द केले हे या पुस्तकातून वाचायला मिळते . जीवंतपणी त्यांच्या विचारांची हत्या करण्याचे प्रयत्न केले गेले . ते मरणाआधी मरण भोगून जगले . त्यांना न्यायालयात खेचण्यात आले . गाथा इंद्रायणीत बुडवण्यात आली . तरीही आम्हीच नशीब लिहीणाऱ्या देवाचे स्वयंभू बाप आहोत अशी त्यांनी भूमिका मांडली . https://amzn.to/3luQJyF त्यांची तत्वे, जिवननिष्ठा यासाठी त्यांनी संघर्ष केला .

या पुस्तकाच्या प्रेरणेने साप्ताहीक तमन्ना न्यूज (जालना ) मध्ये संत तुकोबावाणी या सदरातून त्यांच्या चरीत्रावर पंचावन्न भाग लिहीले . आनंदाचे सिक्रेट … आनंदवेल हे व्यक्तीमत्व विकास वर आधारीत पुस्तक लिहीले . माझ्या जीवनातील दुःखाच्या प्रसंगी मला संत तुकारामांच्या अभंगांनी बळ दिले . माझ्या जीवनात अनुराग चा (पहीला मुलगा ) मृत्यू, समृध्दीचे अंध, अपंग आणि मतीमंदत्व तसेच बापूंचा पॅरालिसीस वगैरे संकटात लढण्याचे बळ मिळाले . कौटूंबिक, आर्थिक आणि सामाजिक संकटात माझ्या मनात संत तुकाराम अभंगाच्या रुपाने देवदूतासारखे उभे राहीले . मला संकटे, अडचणी, दुःख यांच्या काळात इन ट्यूशन पावर मिळाली .जीवनात ज्यांना विवेकाचे भक्कम अधिष्ठान पाहीजे त्यांनी संतसूर्य तुकारामांच्या जीवनचरीत्रावर आधारीत विद्रोही तुकाराम हे पुस्तक आवश्य वाचावे . संग्रही ठेवावे .सप्रेम भेट द्यावे . तुमच्या जीवनप्रवासात चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये म्हणून हे पुस्तक वाचावे .विठ्ठल विठ्ठल विठ्ठल …. जय रामकृष्ण हरी ..

५ ) Rich Dad, Poor Dad by Robert T Kiyosaki ( श्रीमंत वडील आणि गरीब वडील )

हे आंतरराष्ट्रीय खपाचे सदाहरीत पुस्तक आहे . पर्सनल फायनान्सवरील जगातील सर्वात प्रभावी पुस्तक म्हणजे रिचडॅड, पुअर डॅड आहे .आपल्याला शाळेत आर्थिक साक्षरता दिली जात नाही . पैशाकडून काम कसे करून घ्यावे ?पैशाला कामाला कसे लावावे हे शाळेत शिकवले जात नाही . आपल्या घरी -चांगल्या शाळेत जा . चांगली मार्क पाड . चांगली नोकरी कर म्हणजे तुला चांगली बायको मिळेल असे शिकवले जाते . मालमत्ता आणि दावित्व यातील फरक मला याच पुस्तकामूळे प्रथम समजला . सुमारे दोन हजार चार साली हे पुस्तक माझ्या वाचनात आले . या पुस्तकामूळे मला लोकायत( चार्वाक ) दर्शन वेगळ्या दृष्टीकोनातून आकलन झाले . आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण काय डावपेच शिकून घ्यावेत हे मला समजले . माझे आर्थिक जीवन या पुस्तकाने पूर्ण बदलले . महात्मा फूले आणि चार्वाक यांच्या बरोबरीने मी रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाला माझ्या पैशाचं झाड पुस्तकाचे प्रेरणास्थान मानतो .

गरीब लोक पैशासाठी काम करतात . श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात . श्रीमंत लोक पैशाकडून काम करून घेतात . श्रीमंत लोक उत्पन्न देणारी मालमत्ता खरेदी करतात . गरीब लोक लायाबिलीटीलाच मालमत्ता समजतात . श्रीमंत हे कर्जाचा उपयोग लिवरेजचे साधन म्हणून करतात . पैशासाठी काम करू नका . शिकण्यासाठी काम करा असे रॉबर्ट कियोसाकी म्हणतात . हे अर्थ साक्षरतेवरील उत्तम पुस्तक आहे . https://amzn.to/38Lvi8P एकदा नाही तर अनेकदा वाचून व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करण्याचे पुस्तक म्हणजे रिचडॅड, पुअर डॅड होय . हे कादंबरी सारखे समजण्यास अतिशय सोपे आहे . हे पुस्तक मराठीतून आहेच परंतु इंग्रजी पुस्तक सुद्धा समजायला सोपे आहे .

रविंद्र टी कदम

Tags : ,